टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्यातील तरुणांनी ‘माय पोर्टल’ वा ‘विकसित भारत’ या अभियानात सामील व्हावे आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पुढे यावे. तसेच विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
पुण्यातील खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात ‘विकसित भारत अंबेसिडर युवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाच्या आवारात ‘एक झाड आईच्या नावाने (एक पेड़ माँ के नाम)’ या केंद्र शासन प्रायोजित उपक्रमांतर्गत रक्षा खडसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच त्यांनी महाविद्यालयातील तरुण यूट्यूबर्सशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. रक्षा खडसे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
‘माय भारत पोर्टल’ विषयी माहिती देऊन यात सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचा आराखडा शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रिडा, आणि संस्कृती या पाच स्तरांवर आधारित असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय नेमबाजपटू आश्विनी पाटील हिचा सत्कार खडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी, रक्षा खडसे यांचा कृष्णकुमार गोयल यांनी सत्कार केला. याप्रसंगी सचिव आनंद छाजेड, सर्व संस्था पदाधिकारी, सहायक आयुक्त सूरज महाजन, शासकीय अधिकारी, आणि संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नीलेश काळे यांनी आयोजन केले. डॉ. शीतल रणधीर व प्रा. राजेंद्र लेले यांनी सूत्रसंचालन केले, आणि सचिव आनंद छाजेड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
