महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, त्यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.
आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाला होता.
आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, मेहुणे प्रकाश कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दहिभाते यांच्यासह काही साथीदारांना अटक करण्यात आली.
आंदेकर यांचा खून झाल्यानंतर नाना पेठेतील समाधान चौकात राहणारा प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३) पसार झाला होता. आंदेकर यांचे मेहुणे गणेश याच्यावर खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देणे, तसेच पैसे उभे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कोमकर, बेल्हेकर, गायकवाड, दहिभाते यांनी आंदेकरांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. आंदेकर खून प्रकरणात सुरुवातीला तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यापैकी एक सज्ञान असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे तात्यासाहेब गायकवाड (वय १८) याला अटक करण्यात आली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात प्रसाद बेल्हेकर याने मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावली होती.
याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) गणेश इंगळे यांनी दिली. सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (युनिट ०१), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, शुभम देसाई, व राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
