वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगर येथे चोरीच्या बहाण्याने खून करणाऱ्या आरोपीला १० तासांच्या आत वारजे पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबरच्या मध्यरात्री वारजे पोलीस ठाणे हद्दीतील कर्वेनगर परिसरात चोरी करून खून झाल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक १ आणि वाहन चोरी व दरोडा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. अमोल पंढरीनाथ निवंगुणे (रा. श्रीमान सोसायटी, कर्वेनगर, पुणे) यांच्या राहत्या घरात दोन इसमांनी चोरी करून त्यांचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
मात्र, घटनास्थळाची पाहणी व चौकशी केल्यानंतर चोरी झाल्याचे दिसले नाही. खूनाचा बनाव केल्याचे लक्षात आले. मयत अमोल निवंगुणे यांच्या पत्नीची चौकशी केली असता, ती काहीतरी लपवत असल्याचे स्पष्ट झाले.
अधिक चौकशीत, तिने तिच्या मित्र प्रसन्न साहेबराव कोकरे (रा. सिंहगड रोड, पुणे) याने अमोल निवंगुणे यांचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी प्रसन्न साहेबराव कोकरे (वय २७, रा. आनंद विहार, सिंहगड रोड, पुणे) याला सिंहगड रोड परिसरातून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीला पुढील तपासासाठी वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत, आरोपीचे मयत अमोल निवंगुणे यांच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण संबंध होते.
मयत व्यक्तीने आरोपीला यापूर्वी मारहाण केली होती, ज्याचा राग धरून आरोपीने खून केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने हा खून केवळ १० तासांच्या आत उघड केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, वाहन चोरी व दरोडा पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, तसेच पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, गणेश ढगे, महेश पाटील, साईकुमार कारके, अंकुश भिसे यांनी योगदान दिले.
