येरवडा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एन. के. गँगचा म्होरका निखील उर्फ निक्या मधुकर कांबळे (टोळी प्रमुख) आणि त्याचे इतर ३ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे येथे फिर्यादी यांचे पोटाला पिस्तूल लावून धमकी देऊन गळ्यातील ९,०००/- रुपये किंमतीची सोन्याची चेन व हातातील १६,०००/- रुपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली होती.
या गुन्ह्यात आरोपी १) सुदेश गायकवाड (रा. नेताजी शाळेजवळ, सुभाषनगर, येरवडा, पुणे) २) निखील कांबळे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि त्याचे इतर २ अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी १) निखील उर्फ निक्या मधुकर कांबळे, २) सुदेश रुपेश गायकवाड, आणि ३) अतिव उर्फ बांडा अखिल सैय्यद (वय १९ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी निखील उर्फ निक्या मधुकर कांबळे याने विविध टोळी सदस्यांच्या मदतीने वारंवार खुनाचे प्रयत्न करणे, जबर दुखापती करणे, शिवीगाळ करणे, सार्वजनिक शांततेच्या विरोधात अपराध करणे, प्राणघातक हत्यारांसहित बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगाकरणे, दहशत माजवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, चोरी करणे असे गंभीर गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपींनी संघटीतपणे, दहशतीच्या मार्गाने, बेकायदेशीरपणे स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सदरचा गुन्हा केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे कांबळे आणि त्याच्या साथीदारांवर अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील यांना मकोका अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून, मनोज पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आरोपींवर नमुद गुन्ह्यांच्या कलमांत मकोका कायद्याप्रमाणे कलम वाढ करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, प्राजंली सोनवणे करीत आहेत.
सदरची कामगिरी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, आणि महिला पोलीस अंमलदार मोनिका पवार यांनी केली आहे.
