आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

Spread the love

सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ५ वर्षांपासून १८ गुन्ह्यांतील फरार आरोपीस अटक केली असून आवताडे शुगर फॅक्टरी, मंगळवेढा येथील चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री आवताडे शुगर फॅक्टरी, बालाजी नगर, नंदूर ता. मंगळवेढा येथील साखर कारखान्याच्या आवारातील WTP प्लॅन्टजवळील स्टोअर रूममधून चोरट्यांनी ५,९४,७२० रुपयांचे गनमेटल (ब्रास मटेरियल) अंदाजे ६०० किलो वजनाचे साहित्य चोरून नेले होते.

सुरक्षा अधिकारी चंद्रकांत नारायण राठोड (वय ४८) यांनी फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्ह्यांचा आढावा घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना तसेच त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळे पथक तयार करून सुचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते.

मोहोळ येथे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय माहिती मिळाली की आवताडे शुगर फॅक्टरी येथील चोरीचा गुन्हा सुरज उर्फ डम्या रवी चव्हाण याने त्याच्या साथीदारांसोबत केला आहे.

तो सध्या सौंदणकट (ता. मोहोळ) येथे वास्तव्यास आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास सौंदणकट येथून ताब्यात घेतले. साखर कारखान्यातील गनमेटल ब्रास साहित्याची चोरी केल्याची त्याने कबुली दिली.त्यानंतर मोहोळ येथील भंगार व्यवसायिक जावेद शेख यास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले ६०० किलो गनमेटल ब्रास, ५,९४,७२० किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले ३,००,००० रुपयांचे वाहन, असा एकूण ८,९४,७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील २ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ०२ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि वाघमोडे, मंगळवेढा पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदर गुन्ह्यातील आरोपी सुरज उर्फ डम्या रवी चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन यातील दरोडा आणि घरफोडी चोरीसारख्या १८ गुन्ह्यांतील पाहिजे असलेला आरोपी आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहायक फौजदार नारायण गोलेकर, हवालदार धनाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मनसावले, सागर ढोरेपाटील, अक्षय डोंगरे, समीर शेख, आणि सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधव यांनी बजावली आहे.