आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोयता बाळगणारा तडिपार सराईत गुन्हेगार अडकला जाळयात

Spread the love

पुणे : बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणारा आणि परिसरात दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील तडीपार सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार शिवाजी येवले व सुमित तापकीर यांना रात्रगस्तीदरम्यान माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार कुंदन शिंदे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, २७६ ओटा, अप्पर बिबवेवाडी, पुणे येथे मोठ्या आवाजात आरडाओरडा करून स्वतःच्या हातातील लोखंडी कोयता लोकांना दाखवत होता.

“माझ्याशी पंगा घेतला, तर एकेकाला खपवून टाकीन” असे धमकावत, हातातील कोयता लोकांवर उगारत होता. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांना सांगितली असता, त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कुंदन ऊर्फ यश अनिल शिंदे (वय २१ वर्षे, रा. चाळ नं. ए/१५, खोली नं. ०६, अप्पर ओटा, बिबवेवाडी) याला त्याच्या हातातील लोखंडी कोयत्यासह दुपारी १२ वाजता ताब्यात घेतले.

त्याच्याकडील लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. त्याने तडीपार कालावधीदरम्यान पुणे शहरात येण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नव्हती. पोलीस अंमलदार सुमित तापकीर यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार शिवाजी येवले, सुमित तापकीर, आशिष गायकवाड, अभिषेक धुमाळ, प्रणय पाटील आणि जोतिष काळे यांनी केली आहे.