आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हाडोंग्री येथील घरकुलाच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द

Spread the love

भूम: मराठवाडा मुक्ती संग्रामाचे औचित्य साधून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हस्ते घरांच्या मालकीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मालकीचे, छोटं का होईना, परंतु एक घर असावे असे स्वप्न असते. परंतु गोरगरीब, दलित मजुरांना हक्काचे घर मिळणे कठीण असते. अशा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना स्वप्नातील घर मिळावे यासाठी शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजना, इंदिरा आवास घरकुल योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून आवश्यक त्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

यामध्ये ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, परंतु घरकुल मंजूर झाले आहे, अशा लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या अंतर्गत जागा देण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

“मागेल त्याला घरकुल मिळावे” या उद्देशाने शासनाने घरकुल योजना काटेकोरपणे राबवली आहे. हाडोंग्री तालुका भूम येथील लाभार्थ्यांना हाडोंग्री ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवक निलम जानराव, सरपंच संदीप मगर, उपसरपंच रविंद्र लोमटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या. नारायण क्षिरसागर, सचिन भरनाळे, आणि सतिश लोमटे या लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.