आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस बोलत असल्याचे भासवून २७ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : आपण सायबर क्राईम शाखेतून बोलत असल्याचे भासवून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पानमळा, सिंहगड रोड परिसरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ७ जुलै रोजी मोबाईलवर संपर्क साधला. सायबर क्राईम शाखा, मुंबई येथून ऑफिसर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर करून एका व्यक्तीने पिस्तूल आणि ड्रग्ज विकत घेतल्याबाबत फिर्यादीवर तक्रार दाखल असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांचे आधार कार्ड मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले गेले असून त्याद्वारे तीन बँकांमध्ये बँक खाती उघडण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर, फिर्यादी यांच्याकडून त्यांची संपत्ती व बँकेची माहिती घेतली. व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास सांगून पुण्यातील ऑफिसरला भेटण्यास सांगितले.

यानंतर, संबंधित व्यक्तीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातील रक्कम एका विशिष्ट बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले व क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादींना ट्रान्सफर केलेली रक्कम परत मिळेल असे सांगून, सायबर क्राईम शाखेतून बोलत असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडून एकूण २७,००,००० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पोलीस निरीक्षक अमोल मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.