आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मतदार यादीत नावे असल्याची खात्री करा

Spread the love

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली असून, एकूण मतदार संख्या ३७,६३,७८९ इतकी आहे. या अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करावी.

ज्या नागरिकांची नावे अजूनही मतदार यादीत नाहीत, त्यांनी निरंतर प्रक्रिया अंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. मतदानाच्या दिवशी अनेक वेळा आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार मतदारांकडून केली जाते.

ही तक्रार येऊ नये यासाठी नागरिकांनी आताच काळजी घ्यावी. दि. ६ ऑगस्ट २०२४ च्या प्रारूप मतदार यादीत एकूण ३६,९२,४०९ मतदार होते, त्यात पुरुष १९,०८,१४६, महिला १७,८३,९६६ आणि इतर २९७ मतदारांचा समावेश होता. दि. ३० ऑगस्ट २०२४ च्या अंतिम मतदार यादीत एकूण ३७,६३,७८९ मतदार असून, त्यात पुरुष १९,३५,९७९, महिला १८,२७,५०८ आणि इतर ३०२ मतदारांचा समावेश आहे.

यादीत ७५,८२४ मतदारांची वाढ झालेली आहे. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. मतदार यादीतील कोणतीही माहिती आवश्यक असल्यास किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास, संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.