भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता नगर रस्त्यावरील खराडी भागात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडला. या अपघातात चैतन्य उमेश शिंदे (वय २३ वर्षे, रा. सुप्रीम आंगण सोसायटी, आर.एम.सी. गार्डन, बायफ रोड, वाघोली) ठार झाला. चैतन्यचे वडील उमेश शिंदे (वय ४८ वर्षे, रा. वाघोली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
चैतन्यने संगणकशास्त्र अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला होता आणि तो खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीला लागला होता. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास, तो नगर रस्त्याने दुचाकीवर निघाला होता.
रिलायन्स मार्टजवळ भरधाव डंपरने चैतन्यला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातात चैतन्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डंपरचालक अपघातानंतर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश खटके करत आहेत.
