आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलासह पकडले

Spread the love

पुणे : नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोघांकडून गावठी पिस्तुल ताब्यात घेतली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे आणि अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.

पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे या दोघांकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ कारवाई केली. तन्मय राजू थोरात (वय २१ वर्षे, रा. रविवार पेठ, नाईक हॉस्पिटलजवळ, पुणे) व प्रशांत बाळासाहेब धुमाळ (वय ३५ वर्षे, रा. गजानन महाराज मठ चौक, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे) यांना बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह पकडण्यात आले.

त्यांच्यावर पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तपास पर्वती पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, किरण पवार, तसेच पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे, सुभाष मोरे, पुरुषोत्तम गुन्ला, सद्दाम शेख, सुर्या जाधव, अनिस तांबोळी, अविनाश कांबळे, राकेश क्षिरसागर यांनी केली आहे.