आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दिघीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

Spread the love

पुणे : दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का दाखल गुन्ह्यात आरोपी शाम रवि विटकर (वय २३ वर्षे, रा. साठे नगर, पद्मावती रोड, आळंदी देवाची, तालुका खेड, पुणे) मागील १ वर्षापासून फरार होता.

त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखेने आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळवली.

आरोपी विटकर हा घर नंबर १००१, गोलंदाज चौक, वडारवाडी, पुणे येथे त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार किशोर बर्गे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना ही माहिती दिली.

त्यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार येडे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, पोलीस नाईक अमोल राऊत, व पोलीस अंमलदार किशोर बर्गे यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि शाम रवि विटकर याला ताब्यात घेतले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार, त्यास पुढील तपासासाठी दिघी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरी खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार येडे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अमोल राऊत व किशोर बर्गे यांनी केली आहे.