आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वृध्द महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा पकडला

Spread the love

पुणे : वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी स्वामी नारायण मंदिर परिसरात एका वृध्द महिलेस पत्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी करण्यात आली होती.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल भोस यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम व त्यांच्या पथकास हा गुन्हा उघड करण्यास सूचना दिल्या होत्या.

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरू होता. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, अमोल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी जे.एस.पी.एम.कॉलेज वाघोली समोरील इमारतीजवळ थांबलेला आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी कारवाई केली. आरोपी ओम महादेव यादव (वय १९ वर्षे, रा. हनुमान मंदिर, कोरडेवाडी, ता. केज, जि. बीड; सध्या रा. बकोरी फाटा, जे.एस.पी.एम. कॉलेजजवळ, वाघोली, पुणे) यास ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने चोरी केलेले २१.४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत १ लाख रुपये) घरात लपवून ठेवले असल्याचे कबूल केले. पोलिसांनी ते मंगळसूत्र जप्त केले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.