येरवडा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या २ दुचाकी व ६ मोबाईल असा एकूण २,२१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ ऑक्टोबर रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन संशयित इसम दोन मोपेड गाड्या विक्रीसाठी येरवडा येथे येणार आहेत.
येरवडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके व अंमलदार सुशांत भोसले, अनिल शिंदे, विजय अडकमोल, स्वप्निल घोलप यांनी तेथे जाऊन छापा टाकला.
पळून जाणाऱ्या यश सागर ओंबाळे (वय २३ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, कंजारभाट, येरवडा) व ओमकार राजेश मोरे (वय २१ वर्षे, रा. स. नं. १४, रामनगर, येरवडा) यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन मोपेड गाड्या व ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
चोरीच्या दुचाकींबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या २ मोपेड गाड्या व ६ मोबाईल असा एकूण २,२१,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा, पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केली आहे.

