हडपसर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचं आमिष दाखवून ४३ जणांना सुमारे सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना शेअर मार्केट शिकण्याची आवड होती. त्यासाठी ते हडपसर येथील शेअर मार्केट क्लासमध्ये गेले. क्लासचे संचालक प्रतीक कुमार चौखंडे यांनी फिर्यादींना सांगितलं की, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दर महिन्याला १० टक्के परतावा दिला जाईल.
फिर्यादींनी प्रतीक कुमार चौखंडे यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये २५,००,००० रुपये गुंतवले आणि त्याबाबत करारनामा केला. मात्र, ऑगस्ट २०२४ पासून प्रतीक चौखंडे यांनी परतावा देणं बंद केले. नंतर फिर्यादींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
अधिक माहिती घेतल्यावर, फिर्यादींसह इतर ४३ गुंतवणूकदारांचीही प्रतीक चौखंडे यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांकडून एकूण ५,९६,२१,००० रुपये इतक्या मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली असल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदर आरोपी फरार झाला होता. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रतीक कुमार चौखंडे (वय ३६, रा. स्वप्नलोक सोसायटी, पापडे बस्ती, फुरसुंगी) याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर करत आहेत.
सदर कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी पार पाडली.

