आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्नीचा खून करून पती फरारी

Spread the love

पुणे : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील शिंदेवस्तीत घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती सहा वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव आरती देबिलाल सरेन (वय ३५) असे आहे. पती देबिलाल लक्ष्मणचंद्र सरेन (वय ३८, रा. शिंदेवस्ती, हडपसर, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी घरमालक दत्तात्रय शंकर चौधरी (वय ५५, रा. तुकाईदर्शन, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. सरेन कुटुंब मूळचे पश्चिम बंगालचे असून, ते सहा महिन्यांपासून शिंदेवस्तीत भाड्याने राहत होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे.

पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. देबिलालने आरतीचे डोके भिंतीवर आपटले आणि तिच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार करीत आहेत.