आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर पोलिसांनी युवकाला गावठी कट्ट्यासह पकडले

Spread the love

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी एका युवकाला पकडले असून, त्याच्याकडून 40,000/- रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदारांना विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या व्यक्तींबाबत गुप्त माहिती संकलित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या निर्देशानुसार, गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार अशा व्यक्तींची माहिती संकलित करत होते. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील होनसळ फाटा येथे एक व्यक्ती त्याच्या ताब्यात देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या बातमीनुसार, राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग आणि गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदारांचे पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या.

त्या निर्देशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अभंग आणि पथकाने सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील होनसळ फाटा येथे छापा टाकला. तेव्हा तेथे एक काळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या-हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट घातलेला, समोरून विरळ केस असलेला इसम मिळाला.

संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याला शिताफीने गराडा घालून जागीच पकडले.

आरोपीचे नाव सुग्रीव उत्तरेश्वर करंडे (वय २६, रा. होनसळ, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) आहे. त्याची अंगझडती घेतली असता, पॅन्टमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा आढळून आला. त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले.

ताब्यात घेतलेल्या इसमाच्या ताब्यातून ४०,०००/- रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक लालसिंग तुकाराम राठोड यांनी पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, नागेश कोणडे, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ आणि वैभव सूर्यवंशी यांनी पार पाडली.