यशदाच्या नियामक मंडळ सदस्यपदी नियुक्ती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी उद्योजक विशाल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असेल. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
विशाल चोरडिया यांच्यासह प्रो. जयंत बी. उदगावकर (संचालक, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), पाषाण), रणजीत सिंह देओल (प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय), जयंत एस. कावळे, भाप्रसे (से.नि. माजी सहसचिव, ऊर्जा विभाग), डॉ. विद्या येरवडेकर (प्र-कुलगुरु, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) यांचीही नियामक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असेल. चोरडिया आणि येरवडेकर अशासकीय सदस्य असतील. यशवंतराव चव्हाण ॲकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन (यशदा) ही महाराष्ट्र सरकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे.
ही नामांकित संस्था शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते आणि सरकारी विभाग तसेच ग्रामीण व शहरी अशासकीय भागधारकांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून 1990 मध्ये “यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी” (यशदा) असे या संस्थेचे नामकरण करण्यात आले.

