महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका संशयित आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याबाबत सह-पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, इतर दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, यापेक्षा जास्त माहिती आत्ता देता येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या आरोपीबाबत पीडित तरुणीने खातरजमा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने या नराधमांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.
येवलेवाडीच्या एका वाईन शॉपमधून दारू खरेदी करत असताना ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते, असे सांगण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गोपनीयता बाळगली असून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुण-तरुणींपैकी तरुणाला मारहाण करून बांधून ठेवले गेले होते. त्यानंतर तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेले काही दिवस पुणे पोलीस दिवसरात्र तपास करीत होते.
यासाठी पोलिसांची ६० पथके काम करीत होती. आरोपींची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, नवीन ७ पोलीस ठाण्यांचे उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे.
