आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जबरी चोरी करणारा सराईत २ वर्षासाठी तडीपार

Spread the love

पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार सौरभ विलास शिंदे (वय २६ वर्षे, रा. फुलगाव, ता. हवेली) याला पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुलगाव, तुळापूर, पेरणे फाटा, लोणीकंद तसेच आसपासच्या भागात त्याने जबरी चोरी करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार प्रशांत कापरे, सागर कडू, शुभम सातव यांनी तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, पुणे, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांना पाठवला होता.

पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी गुन्हेगारास पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. सदर तडीपार केलेला इसम पुणे जिल्ह्यात आढळल्यास त्याची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड यांनी केले आहे.