आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सेटलमेंट करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक फौजदार निलंबित

Spread the love

पुणे : दिवाळीच्या तोंडावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक फौजदार यांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून २ लाखांत सेटलमेंट करणारे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या दंगा नियंत्रण पथकामध्ये कार्यरत होते. श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस निरीक्षक असताना, फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी त्यांनी सांगितल्यावर, सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी त्याची पडताळणी केली. त्यात क्षीरसागरने तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. यावेळी तक्रारदाराकडून संशय आल्यामुळे श्रीहरी बहिरट यांनी त्याच्याकडील व्हॉईस रेकॉर्डर काढून घेतला होता.

यानंतर सापळा कारवाई झाली नाही, परंतु लाचेची मागणी झाल्याने क्षीरसागर याच्याविरुद्ध खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करीत आहे. लवकरच बहिरट यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.