स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव (रा. जैनापूर, विजयपूरा) हे त्यांच्या साथीदारासह चाकण ( जि. पुणे) येथे बकरीचा व्यापार करून पिक-अप वाहनातून दि. ०५ ऑक्टोबर रोजी पहाटे विजयपूर कडे जात होते.
टेंभूर्णी पोलीस ठाणेच्या हद्दीतून पंढरपूरमार्गे जात असताना परीते पाटीवरील गतिरोधक जवळ आले असता पाठीमागून लाल रंगाचे पल्सर मोटार सायकल वरील अज्ञात चोरट्यांनी येवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. व त्यांचेकडील रोख रक्कम, दोन मोबाईल असा एकूण २,५७,०००/- रूपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला होता.
याबाबत टेंभूर्णी पोलीस ठाणेस जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा हा राष्ट्रीय महामार्गावर घडला असल्याने गुन्ह्याचे घटनास्थळास वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे साठी पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांना व पथकास वेळोवेळी मार्गदर्शन केले.
त्यावरून पोउपनि रविराज कांबळे यांनी टेंभूर्णी व अकलूज भागात पेट्रोलिंग करून व गोपनिय बातमीदार यांच्यामार्फत आरोपींचा शोध घेत होते. त्यामध्ये अकलूज येथील खबऱ्याकडून न गुन्ह्याच्या दिवशी अकलूज येथील काही गुन्हेगार वृत्तीचे लोक ” स्कीम आली आहे ” असे म्हणून बाहेरगावी गेले असल्याची माहिती मिळाली होती.
त्यावरून पोउपनि कांबळे व पथकाने अकलूज येथे तळ ठोकून जास्तीत जास्त माहिती गोळा केली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे गुन्हा घडला त्या वेळी घटनास्थळावर वावरत असले बाबत माहिती प्राप्त केली.
त्यावरून आरोपींचा मार्ग काढला असता ते आरोपी अकलूज बाजारतळ येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्यावरून तेथे सापळा लावून एकूण ४ आरोपींना ताब्यात घेवून तपास करता त्यांचेकडून रोख रक्कम, गुन्ह्यात गेलेला मोबाईल व वापरलेली मोटार सायकल असा सुमारे १,००,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींना पुढील तपासकामी टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि, स्था. गु. शा सुरेश निंबाळकर, यांचेसह पोउपनि रविराज कांबळे, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पोना धनराज गायकवाड, अजय वाघमारे, अन्वर आत्तार, राहूल दोरकर, हरीश थोरात, बाळरोज घाडगे, सुनिलपवार यांनी पार पाडली आहे.
