महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : प्राध्यापकांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत मानसिक आरोग्य तज्ज्ञ प्रा. श्रुती शेठ यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात या क्षेत्रातील तज्ज्ञ श्रुती शेठ यांचे सर्व प्राध्यापकांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या वर्षाची थीम “कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य” ही होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्राध्यापकांनाही त्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व उपाययोजना करण्याची गरज असते, या अनुषंगाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले.
यावेळी श्रुती शेठ यांनी कार्यालयीन कामकाज करताना आपल्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बदललेल्या वर्तनातून त्यांच्या मानसिक आरोग्याचा अंदाज कसा घ्यायचा आणि मानसिक आधार कसा व कधी द्यायचा, यावर मंथन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात शिक्षकांची भूमिका यावरही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मुकेश मोहिते आणि प्रा. तेजश्री देवकुळे यांनी केले.
