आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एटीएम कार्ड अदला-बदल करुन पैसे काढणारा गुन्हेगार जाळ्यात

Spread the love

पुणे : एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, तिथे असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादींना एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवला. नंतर हातचलाखी करून फिर्यादीकडील बँकेचे डेबिट कार्ड घेऊन, त्यांना दुसऱ्या बँकेचे डेबिट कार्ड दिले.

त्यानंतर, एटीएममध्ये पैसे नाहीत, असे म्हणून फिर्यादींना तिथून जाण्यास सांगितले. आरोपीने एटीएम कार्ड व पिनच्या मदतीने फिर्यादींच्या बँक खात्यातून २९,०००/- रुपये काढले. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना घडल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे व तपास पथकातील इतर कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना, गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या वर्णनाशी मिळताजुळता इसम जे.एम. रोड येथे दिसला.

पोलीस अंमलदार प्रविण दडस यांनी त्याला थांबवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव प्रमोद सिताराम यलमर (वय ४७ वर्षे, रा. जनवाडी, कुसाळकर पुतळा चौक, पुणे) असे सांगितले. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून विविध बँकांची एकूण १२ एटीएम कार्डे आणि १७,०५०/- रुपये रोख रक्कम सापडली.

पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपीवर पुणे शहरातील तसेच पुणे ग्रामीण भागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अजित बडे करत आहेत.

ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, अतुल साठे, रुपेश वाघमारे, राजकिरण पवार, महावीर वलटे, प्रविण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.