बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : लातूर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून जाणाऱ्या टोळीला बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या सतर्क पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी बार्शी बायपास रस्त्यावर नाकाबंदी करत चार जनांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गांधी चौक, लातुर हद्दीतील अल्पवयीन मुलगा वय 17 वर्षे (रा. लातूर) यास चार इसमांनी अपहरण करून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून बार्शी मार्गे जात आहेत. तरी त्यांचा शोध घ्या अशी माहिती लातूरचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांनी बार्शी तालुका पोलिसांना फोन वरून दिली.
वरिष्ठांना माहीती देवून बार्शी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पथकाने बार्शी बायपास रोड, गाताचीवाडी चौक येथे नाकाबंदी केली. वाहने चेक करीत असताना लातूर कडून एक पांढऱ्या रंगाची कार (नं. MH 10 BM 4556) ही संशयीतरित्या भरधाव वेगाने येत असल्याचे दिसले.
पोलिसांनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आणखीन भरधाव वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूर्ण रोडवर वाहने आडवेलावून सदर कारला थांबविण्यात आले. सदर कारची तपासणी केली असता मिळालेल्या माहीती प्रमाणे आतमध्ये एक भितीने घाबरलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलगा व इतर 4 इसम आढळून आले.
सदर मुलाकडे विचारपूस केली असता सदर मुलाने सोबतच्या 4 इसमांनी लातूर येथून कारमध्ये घालून पळवून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी 1) मुन्ना कांबळे 2) तुकाराम साळुंखे, 3) मंगेश वंजारी 4) शंकर कोयाळकर (सर्व रा. लातूर ) यांना ताब्यात घेतले.
सदर अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पळवून घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवून हि माहिती वरिष्ठ अधिकारी यांना व सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, लातूर यांना कळविण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथक आल्या नंतर सदर अल्पवयीन मुलगा व आरोपी, गुन्ह्यातील वाहन तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
गांधी चौक पोलीस ठाणेस गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून सदरची टोळी ही अतिशय धोकादायक असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे, धनराज केकाण, सुभाष सुरवसे, राहुल बोंदर, शिवशंकर खराडे, ओमप्रकाश दासरे यांनी केली आहे.