दुहेरी हत्याकांडांतील अडीच वर्षांपासुन फरार आरोपी केला जेरबंद
युनिट ६ गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुहेरी हत्याकांडातील अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस पथकाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट ६ मधील अधिकारी व अंमलदार गस्त घालत होते.
त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दळवी, पोलीस अंमलदार ताकवणे, व्यवहारे, पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी ऋग्वेद जालिंदर वाळके (वय २३ वर्षे) हा पेरणे टोलनाका शेजारी सागर हॉटेलजवळ येणार आहे.
पोलीस पथकाने तेथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी खून, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे इत्यादी गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक दळवी, पोलीस अंमलदार सकटे, मेमाणे, मुंढे, कारखेले, ताकवणे, व्यवहारे, पवार, काटे, धाडगे, तनपुरे, महिला पोलीस अंमलदार पानसरे, मांदळे यांनी केली आहे.
