डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात रात्र गस्त घालत असताना एका चोरट्याने पोलीस मार्शलवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस हवालदार महेश तांबे यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास अभिनव विद्यालय पथ, जानकी व्हिला बंगल्याजवळील रस्त्यावर, एरंडवणे, पुणे येथे ही घटना घडली.
फिर्यादी तांबे आपल्या साथीदार सातव यांच्यासह मार्शल ड्युटी पेट्रोलिंग करत असताना त्यांना सहा जणांचे टोळके दिसले. धारदार शस्त्रांसह गंभीर स्वरूपाचा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या या टोळक्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्या चोरट्यांनी संगनमताने फिर्यादींच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला.
फिर्यादी शासकीय काम करत असताना त्यांना कामात अडथळा निर्माण करून जखमी केले व झटापट करून अंधाराचा फायदा घेत त्यांच्या दोन दुचाकींसह चोरटे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.