हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ब्लॅक ओरा क्लासिक या यु ट्यूबर चॅनल धारकाने ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी सुरू करून, त्यात गुंतवणूक केल्यास १५ महिन्यांत तीन पट पैसे देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.
याबाबत विनोदकुमार शेखरन वनियेर (वय ३०, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी इसाक बागवान (रा. सांगली), फाउंडर इस्माईल, दस्तगीर पटेल, जहांगिर खान, जिशान रियाज हेबळीकर आणि ब्लॉक ओरा क्लासिक या यु ट्यूबर चॅनल धारक रवी निले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगरमधील अर्निग आर्ट ऑफिस येथे १८ जानेवारी २०२२ ते आतापर्यंत घडला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इसाक बागवान हा कोअर ग्रुपचा सदस्य असून, त्याचे इतर साथीदार व ब्लॅक ओरा क्लासिक यु ट्यूबर चॅनल धारक यांनी ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी सुरू केली.
त्याची प्राथमिक किंमत ५० रुपये ठेवण्यात आली होती. या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास १५ महिन्यांत तुम्हाला तीन पट परतावा मिळेल, तसेच दररोज १ टक्के दराने लाभ मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच, तुमच्या माध्यमातून आणखी लोकांनी गुंतवणूक केल्यास, त्यावर थेट ५ टक्के रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले गेले.
फिर्यादींना खोटी आश्वासने देण्यात आली. फिर्यादींनी आरोपींकडे एकूण ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली, ज्यातून त्यांना एकूण २८ लाख रुपयांचा परतावा मिळाला. मात्र, आरोपींनी हे पैसे फिर्यादींना न देता, त्यांच्या वेगवेगळ्या युजर आयडी तयार करून त्यात गुंतवणूक केली.
त्याशिवाय फिर्यादी आणि त्यांच्या मित्र परिवाराने मिळून एकूण २ कोटी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे, जे आरोपींनी परत करणे अपेक्षित आहे. आरोपींनी फिर्यादी व इतरांना नोटरी करारनामा करून दिला होता. परंतु, पैसे परत मागितल्यावर, फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.