आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच घेताना पकडले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Police, Social • November 20, 2024
Spread the love

पुणे : नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

याबाबत ४४ वर्षाच्या तक्रारदाराने तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटच्या लाईट बिलावरील पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे महावितरणच्या आॅनलाईन साईटवर अपलोड करुन देण्यासाठी आशिष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती क्षीरसागर याने ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी धनकवडी येथील महावितरण उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून ८०० रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.