आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वर्गात जाऊन अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर काचेने वार

Spread the love

पुणे : गॅदरिंगच्या संबंधाने झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका १४ वर्षाच्या मुलाने वर्गात जाऊन १५ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मांजरी येथील सुभद्रा नर्सरी भोसले पब्लिक स्कुलमधील इयत्ता ९ वीच्या वर्गात मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही अल्पवयीन असून एकाच वर्गात शिकतात.

त्यांच्यामध्ये गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या संबंधातून शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन १४ वर्षाचा मुलगा हातात काचेचा तुकडा घेऊन वर्गात शिरला. त्याने ९ वी अ च्या वर्गात बसलेल्या मुलाच्या पाठीमागून येऊन १५ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार केला.

ती काच त्याच्या गळ्याच्या उजव्या बाजुवर घुसवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १५ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरोपीला विरोध केला असता त्याने मी तुझी विकेट पाडेन असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी १४ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.