ह्युमन ट्रॅफिकिंग प्रकरणात डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तुमच्या नावावर मनी लाँड्रिंग आणि ह्युमन ट्रॅफिकिंगची केस नोंदवली असून पुढील दोन तासांत तुमचा मोबाईल बंद होणार असल्याची भीती दाखवून एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल ३४ लाख रुपयांचा गंडा घातला.
याबाबत बाणेर येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ व १२ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. फिर्यादी या एका कंपनीत मॅनेजिंग पार्टनर आहेत.
११ सप्टेंबर रोजी फिर्यादींना एक व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्याने टेलिकॉम अथॉरिटीज ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून पुढील दोन तासांत तुमचा मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगितले.
त्यांनी याचे कारण विचारले असता, संबंधित व्यक्तीने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये एक मनी लाँड्रिंग आणि ह्युमन ट्रॅफिकिंगची केस नोंदवली असून त्यामध्ये फोन कॉल आणि मेसेज करण्यासाठी तसेच फिर्यादीला धमकाविण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईलपैकी दोन क्रमांक त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले.
त्यामुळे तुमचा नंबर ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आल्याचे त्याने सांगितले. जर तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे सांगत कॉल एका व्यक्तीकडे ट्रान्सफर केला. कॉलवर असलेल्या व्यक्तीने मुंबईमधील आयपीएस विक्रम सिंग असल्याचा दावा करत, आपले नाव आणि आधार क्रमांक सांगितले.
त्याने सांगितले की, आमच्याकडे नोंदवलेल्या केसमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तुमचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले जात आहे, असे सांगत व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले.
यानंतर, तुमचे एचडीएफसी बँकेमध्ये खाते असून बँकेचे कर्मचारीही यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले. बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याची गरज आहे, असे सांगून दोन्ही खात्यांमधील फंड ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फिर्यादींनी चार व्यवहार करून एकूण ३४ लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर, संशय आल्यावर त्यांनी या प्रकरणाबाबत मित्राला सांगितले. मित्राने चोरट्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
त्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी १३ सप्टेंबर रोजी ऑनलाइन सायबर क्राईम पोर्टल आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील पुढील तपास करत आहेत.
