ओटोमोबाईल दुकानदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे – अशोक लेलंड या कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट तयार करून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ओटोमोबाईल दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवणनाथ विष्णू केकाण (वय ४२, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक लेलंड कंपनीचे स्वामित्व हक्क त्यांच्या कंपनीकडे आहेत. परंतु, अशोक लेलंडच्या नावाने हुबेहूब बनावट स्पेअरपार्ट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता घोरपडे पेठेतील दीपक ओटोमोबाईल या दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान, दुकानात अशोक लेलंडच्या मूळ स्पेअरपार्टसारखेच दिसणारे, ३६,३२९ रुपयांचे ५ बनावट स्पेअरपार्ट विक्रीसाठी
ठेवलेले आढळले.
या स्पेअरपार्टवर मूळ कंपनीच्या छपाईसारखीच छपाई, होलोग्राम, एमआरपी स्टिकर आदींसह सर्व खोट्या गोष्टी आढळल्या. या प्रकरणात पोलिसांनी दीपक उत्तमचंद चोरडिया (वय ५६, रा. ब्रम्हा मेजेस्टीक, एनआयबीएम रोड, कोंढवा) याच्यावर कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अशोक लेलंड कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट तयार करून त्यांची विक्री करणे हा गंभीर प्रकार असून, कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकरण उजेडात आणल्याने अशा बनावट उत्पादकांवर वचक बसण्याची शक्यता आहे
