वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले असताना, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कठोर कारवाई केली. ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीच्या पहाटेच्या दरम्यान शहरभर २,६३३ वाहनचालकांवर विविध गुन्ह्यांसाठी कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला.
वाहनचालकांना मद्यपान करून गाडी चालवू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाईसह परवाना रद्द करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकीच्या मुख्य प्रवाहात अडथळा आणणाऱ्यांवर प्रथमच मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या यंदा कमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे तसेच वाढलेल्या कॅब आणि रिक्षा सुविधांमुळे केवळ ८५ जणांवरच मद्यपान करून वाहन चालवण्याची कारवाई झाली. एकूण २,६३३ वाहनचालकांवर कारवाई करून १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नववर्षाच्या स्वागतात वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
