आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त

Spread the love

पुणे : नववर्षानिमित्त बंदोबस्त करत असताना सहकारनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. चौकशीत त्याने हौसेखातर पिस्तूल बाळगल्याचे निष्पन्न झाले.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नववर्षाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी गस्त घालत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, के.के. मार्केटच्या पार्किंगजवळ, टीव्हीएस शोरूमच्या मागील गल्लीत एका बंद दुकानासमोर एक मुलगा संशयास्पदरीत्या उभा आहे.

त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बालाजीनगरला जाऊन दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले, सुमारे ६० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह जप्त करण्यात आले.

चौकशीत त्या मुलाने सांगितले की, हे पिस्तूल त्याला कॅनॉलजवळ सापडले होते. त्याच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र, सध्या त्याचे शिक्षण थांबले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही कामगिरी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत आणि खंडू शिंदे यांनी केली.