जितेंद्र डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी, पत्नी एसआरपीएफमध्ये, तर मेहुणे पीसीएमसीत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नती होऊन त्यांची जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन अधिकारी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत राहून पुण्याचा कारभार सांभाळणार आहेत.
जितेंद्र डुडी सध्या पुणे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी आंचल दलाल या आयपीएस अधिकारी असून, त्या पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) कार्यरत आहेत. त्यांच्या मेहुण्यांपैकी शेखरसिंह डुडी हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
जितेंद्र डुडी हे २०१६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या शाखेचे सनदी अधिकारी आहेत. ते मूळचे रायपूरचे असून, प्रशासकीय सेवेत त्यांनी झारखंड राज्यातून सुरुवात केली. केंद्र सरकारमध्ये सहायक सचिवपदी काम पाहिल्यानंतर २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्रात पदस्थापना झाली.
पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नरचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.आंचल दलाल यांनी सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पुण्यात राज्य राखीव पोलीस दलात बदली झाली. शेखरसिंह डुडी हे सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
