कोरेगाव पार्कमधील घटना, २४ तासात आरोपीला पकडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरात एकटे राहणार्या ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी केअर टेकर नेमला होता. त्याने त्यांची काळजी घेण्याऐवजी या ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून घरातील रोकड व मोबाईल चोरुन नेला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले.
हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत १ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला. याबाबत प्रसाद अग्रवाल यांचा मुलगा मुलगा रवींद्र प्रसाद अग्रवाल (वय ५६, रा. गंगा मेलरोजी, सोपानबाग) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल जगदीशप्रसाद अग्रवाल ८० वर्षांचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात. त्यांनी वडिलांच्या देखभालीसाठी १५ ते २० दिवसांपूर्वी एका मुलाला नेमले होते. १ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या दरम्यान आला.
त्याने बेडरुममध्ये वडिलांचे नॉयलॉनच्या दोरीने बांधले़ रुमालाने तोंड बांधुन त्यांना चाकूचा धाक दाखविला. ‘‘तेरे पास जितना पैसा है, वह मुझे दे दे, नही तो यही चाकू से तेरे को मार दुंगा,’’अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे असलेले ३२ हजार व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना बेडरुममध्ये बंद करुन तो पळून गेला.
तो गेल्यानंतर प्रसाद अग्रवाल यांनी तोंडाला लावलेला रुमाल बाजूला काढून आरडाओरडा केला़ त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणार्यांनी त्यांची सुटका करुन मुलाला घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे तो कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेने मध्यप्रदेशाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे समजले.
त्याप्रमाणे भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत सर्व रोख रक्कम व मोबाईल मिळाला. त्याच्याकडील आधार कार्डावरुन तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर, पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
