आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हनुमान टेकडीवर युगुलाला लुटले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People, Police, Social • January 7, 2025
Spread the love

पुणे : बोपदेव घाटातील युवतीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच हनुमान टेकडीवर भर दुपारी फिरायला गेलेल्या युगुलाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खडकी बाजार येथील १७ वर्षीय युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता, हनुमान टेकडीवरील ओपन जिमजवळ घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती तिच्या मित्रासह हनुमान टेकडीवर फिरायला गेली होती. ओपन जिमजवळ थांबले असताना एक चोरटा त्यांच्या जवळ आला. त्याने युवतीला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि तिच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची, अंदाजे एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त साईनाथ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, आणि गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पुण्यातील टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर अशा प्रकारे हल्ले आणि लुटमारीच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर परप्रांतीय तरुणीला मारहाण करून लुटण्यात आले होते. नागरिकांनी टेकड्यांवर एकटे न जाण्याचा आणि सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.