वाघोली पोलिसांनी रिक्षासह २ लाखांचा माल केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करणाऱ्या वाघोली पोलिसांनी संशयास्पदरीत्या थांबलेल्या चालकाच्या रिक्षाची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी रिक्षासह २ लाख १६ हजार ६८० रुपयांचा माल जप्त केला आहे.
मोहम्मद जिशान अकबर अली अन्सारी (वय २८, सध्या रा. भावडी रस्ता, वाघोली; मूळ रा. कोतवाली देहात, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघोली पोलिसांचे पथक २८ फेब्रुवारी रोजी गस्त घालत होते.
त्या वेळी मोकळ्या मैदानात अन्सारी रिक्षासह थांबलेला होता. पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षाची झडती घेण्यात आली. त्यात ६ हजार ६८० रुपयांचा ३३४ ग्रॅम गांजा, मोबाईल आणि रिक्षा असा एकूण २ लाख १६ हजार ६८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, तसेच पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, बापू बेंद्रे यांनी केली आहे.
















