कारचालकांना लक्ष्य करून चोरी करणारे दोन परप्रांतीय चोरटे जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गर्दीच्या ठिकाणी तसेच उभ्या असलेल्या कारचालकांना लक्ष्य करून तुमच्यामुळे नुकसान झाल्याचा बहाणा करून त्यांच्या गाडीतील मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरून नेणाऱ्या ‘टक टक’ गँगच्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पकडले. त्यांनी फरासखाना, अलंकार व विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या चोरट्यांचा मागोवा पोलिसांनी घेतला होता.
रवी ओमप्रकाश कोहली (वय ३८) आणि अफजल कय्यूम अब्बासी (वय ३८, दोघेही रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहराच्या मध्यवस्तीत कारचालकांशी वाद घालून त्यांच्या गाडीतील मोबाईल चोरून नेल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती.
गुन्हे शाखेतील युनिट १ चे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. या गुन्ह्यातील संशयित चोरटे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.
त्याअनुसार पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉजच्या परिसरात सापळा रचून थांबले. मिळालेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे दोघे जण तेथे आले असता पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
अधिक चौकशीत कोथरूडमधील कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारचालकाचे लक्ष विचलित करून चालकाच्या शेजारील सीटवर ठेवलेला अॅपल कंपनीचा आयफोन १७ प्रो व पॉकेट चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले. अलंकार पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या दोघांना अधिक तपासासाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का आणि प्रफुल शेलार यांनी केली.
अपघाताचा बहाणा करून चोरी – विमाननगर चौकात १९ ऑगस्ट २०२५ रोजी एका स्विफ्ट कारचालकाला कार पायावरून गेल्याचा बहाणा करून त्याच्या गाडीतून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे असे दोन मोबाईल चोरल्याचे आरोपींनी सांगितले. विमानतळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.



















