वर्ष २०२० उजाडले काही नवीन आशा –उमेद घेवून पण ही आस काही फार काळ टिकली नाही. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दर १०० वर्षांनी निसर्ग आपले रौद्र रुप दाखवतो म्हणतात ते खरेच आहे. मार्च २०२० च्या अखेरीस अचानक कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आणि हा हा म्हणत या विषाणूने महामारीचे रुप कधी धारण केले समजलेच नाही. प्रत्येक देशासाठी ही नवीन आकस्मिक आपत्ती होती. अचानक काळाने घाला घालावा आणि आपण पूर्णतः बेसावध असावे असेच काही तरी घडले……. त्यात माझी नोकरी कारागॄह विभागातील अत्यंत जबाबदारीच्या आणि संवेदनशील पदावर. काय करावे कोणती उपाय योजना करावी आणि या महामारीतून आपले कर्मचारी, बंदीजन आणि स्वतः सहित आपले कुटुंब कसे तग धरु हाच विचार रात्रंदिवस अस्वस्थ करीत होता. मग अशा वेळी काही धाडसी निर्णय स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करुन तर काही शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार घेतले. आणि त्याचे नक्कीच नोंद घेण्यासारखे फलित प्राप्त झाले.
येरवडा कारागॄह हे राज्यातील सर्वात मोठे, व्यापक आणि अती संवेदनशील कारागॄह म्हणून ओळखले जाते. येथील बंदीसंख्या आणि त्यांचे गुन्ह्यानुसार वर्गवारीची विविधता हि खुप मोठी बाब आहे. परंतू एखाद्या संस्थेचा प्रशासक हा प्रशासकासोबतच तेथील वास्तव्यास असणा-यांचा पालक ही असतॊ हीच भावना ठेवून काही निर्णय त्वरीत घेतले आणि आज गर्वाने सांगावेसे वाटते की या कोरोना महामारी पासून कारागॄहाला सुरक्षीत ठेवण्यात मी यशस्वी झालो. त्यापैकी सर्वप्रथम काही कठोर निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली
१) संपूर्ण कारागॄह १०० % Lockdown करणारे येरवडा हे भारतातील पहिले कारागॄह ठरले व सर्वात उशीरा Lockdown संपविण्याचा मान देखील याच कारागॄहाचा आहे. Lockdown काळात ड्युटीचे नियोजन करताना यात अधिकारी कर्मचा-यांचे २ गट करुन माझ्यासह प्रत्येक गट आळीपाळीने २१ दिवसासाठी स्वतः बंदी जनासोबत कारागॄहात २४ तास राहून कर्तव्य दैनंदिन कामकाज व सुरक्षा पाळत आपले कर्तव्य बजावत होता.
२) बंदीजनांच्या कुटुंबियासोबत च्या अधिकॄत भेटी /मुलाखती तात्काळ बंद केल्या. जेणेकरुन विषाणूचा संसर्ग थोपविता येईल. या निर्णयाने सुरुवातीला नाराज असणारे आणि विरोध करणा-यांना आता हा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती आली
३) दैनंदिन रोटेशन पद्धतीने सरकारी रुग्णालयाच्या मदतीने कर्मचारी व बंद्यांचे swab testing सुरु केले. बाधितांना त्वरीत विलगीकरणात ठेवले.
४) बाहेरुन नव्याने प्रवेशित होणा-या नवबंद्यांना सक्तीने १४ दिवस विलगीकरणासाठी शासकीय स्वतंत्र जागेचे वसतीगॄह उपलब्ध करुन घेतले. नियमित आतील बंद्यापासून त्यांना वेगळे ठेवले. १४ दिवसानंतरच त्यांना मुख्य कारागॄहात प्रवेशित केले.
५) नव्याने प्रवेश घेणा-या प्रत्येक अरोपीचे swab testing केल्याशिवाय त्यांना तात्पुरत्या कारागृहात प्रवेश नाकारला. या साठी शासकीय आरोग्य विभाग व पोलिस विभागाचे देखील सहकार्य लाभले.
६) कारागॄहात जागोजागी हात धुण्यासाठी स्वतंत्र पाणी व सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली. कर्तव्यावर येणा-या आणि आत बाहेर कराव्या लागणा-या लोकांसाठी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली.
७) सर्व बंद्यांना रोज रात्री हळदीचे गरम दूध व “क” जीवनसत्वाच्या गोळ्यांचा पुरवठा केला.
८) सॅनिटायझर, oxometer, आणि काही होमिओपॅथी च्या गोळ्या अशा गोष्टींची मदत काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळविली. त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
९) कादग/फाईल यांची देवाण घेवाण करताना विषाणूचा प्रसार होवू नये या साठी कारागॄहाबाहेर मंडप घालून छावणी कार्यालय सुरु केले व सर्व पत्रव्यवहार कागद हाताळणी येथूनच केली गेली. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी- कर्मचारी यांचा १ चमू तयार केला. जेणेकरुन आतील लोकांना संसर्ग होवू नये.
१०) या LOCKDOWN काळात कर्तव्यावर स्वतःला Lockdown करीत बंदीजनासोबत त्यांना मिळनारे अन्न, नाष्टा, राहाण्याच्या पद्धती, अंघोळी पासून ते असणारे आतील मर्यादित सुविधेसह जीवन आम्ही स्वतः अनुभवले आणि आम्ही देखील कर्तव्य निष्ठ होवून कुटुंबापासून बंद्यासाठी हे कर्तव्य करत होतो या भावनेने प्रशासन व बंदी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले व आमच्याविषयी व प्रशासनाविषयी बंद्यांच्या मनात अधिक आदरभाव वाढीस लागला.
११) एका अधिकारी-कर्मचारी गटाची २१ दिवसाची LOCKDOWN ड्युटी संपताना दुस-या गटाला कर्तव्यासाठी कारागॄहात सोडताना त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुनच आत प्रवेश दिला गेला.
१२) कारागॄहातील बंद्यांना मनोरंजनासाठी असलेल्या रेडिओ च्या माध्यमातून सतत कोविड विषयी जनजागॄती करण्यात येत होती. तसेच तज्ञांमार्फत त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. बंद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटी बंद झाल्याने त्यांची मानसिक अस्वस्थता सांभाळणे खुप जिकरिचे काम आमच्या टीम ने केले.
१३) सर्व अधिकारी- कर्मचारी, वैद्यकीय सेवक यांचे अमूल्य योगदान आणि माझे नेतॄत्व, साहस आणि सर्वांना सोबत घेवून काम करण्याची शैली मला या महामारी पासून कारागॄहाला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरली.
१४) विशेष बाब म्हणजे महिलांसाठी असणा-या स्वतंत्र कारागॄहात आज अखेर एकही महिला बंदी कोरोना बाधित झाली नाही. हे फार मोठे प्रशासनाचे यश म्हणता येईल.
१५) सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेवून देखील या विषाणुने मला च हेरले व मला कोरोनाची लागण झाली. केवळ १४ दिवसांचे विलगीकरण व औषधोपचार घेवून मी तात्काळ पुन्हा सेवेत रुजू झालो.
अशी आहे माझी, माझ्या नोकरीची, माझ्या संघाची, आणि कोरोना महामारी विरुद्ध येरवडा कारागॄह यांच्यातील संघर्षाची कहाणी/ यशोगाथा.
श्री यु.टी.पवार,
अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागॄह पुणे.
