कुरिअर आल्याचे सांगून प्रवेश : तोंडावर स्प्रे मारून केली बेशुद्ध, मोबाईलवर घेतला सेल्फी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका तरुणीवर कुरिअरच्या नावाखाली घरात प्रवेश करून डिलिव्हरी बॉयने स्प्रे मारून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉय कुरिअर असल्याचे सांगून आत शिरला. तो सरळ संबंधित तरुणीच्या घरी गेला आणि म्हणाला, “तुमचे कुरिअर आले आहे. मी पेन विसरलो आहे.”
तरुणीने सांगितले की, “माझे कोणतेही कुरिअर अपेक्षित नाही.” तेव्हा त्याने “सही करावी लागेल” असे म्हणताच तिने सेफ्टी डोअर उघडले. डोअर उघडताच त्याने तिच्या तोंडावर स्प्रे मारला व तिला बेशुद्ध केले. त्यानंतर घरात घुसून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर हा आरोपी निघून गेला. जाताना त्याने पीडितेच्या मोबाईलवर स्वतःचा सेल्फी घेतल्याचे समोर आले आहे. या मोबाईलमध्ये “मी पुन्हा येईन” असा मेसेज त्याने लिहिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेनंतर पीडिता बेशुद्ध अवस्थेत सापडली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पाच पथकांसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या पाच पथकांची स्थापना करून आरोपीच्या शोधासाठी व्यापक मोहिम राबवण्यात आली आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून त्यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. वापरलेल्या स्प्रेचा प्रकार व रसायन तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून आरोपीने सोसायटीत प्रवेश मिळवला. सुरक्षारक्षकाने अधिक चौकशी न केल्यामुळे त्याला प्रवेश सहज मिळाला, हे स्पष्ट झाले आहे.
सदर पीडिता आपल्या लहान भावासह गेल्या एक वर्षापासून त्या सोसायटीत राहत आहे. ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. घटनेच्या वेळी ती घरी एकटी होती. हा नराधम तिच्या ओळखीचा होता का? तो नेमका तिच्याच घरात कसा शिरला? या सगळ्याची सखोल चौकशी आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
