युनिट-५ गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे.
या प्रकरणी परवेझ शेख, (वय- ४० वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातील एकुण ५५,००० रुपये किमतीचे एकुण ५ मोबाईल हॅन्डसेटसह ताब्यात घेण्यात आले आहे. युनिट ५, गुन्हे शाखा, कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट कार्यक्षेत्रात कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत होते.
पोलीस पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेझ शेख याने कोंढवा व हडपसर येथील बसमधुन आणि भाजी मार्केट येथुन मोबाईल चोरी केलेले आहेत. चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी तो शीतल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा येथे येणार आहे.
त्यानुसार युनिट कडील स्टाफने वरिष्ठांच्या आदेशाने शीतल पेट्रोलपंपाजवळ सापळा रचुन आरोपीला शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने कोंढवा येथील एका घराचा दरवाजा उघडा असताना व हडपसर येथे बसमध्ये व भाजी मार्केटमधील नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याचे ५ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, अविनाश लोहटे व पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व राहुल ढमढेरे यांनी केलेली आहे.
