आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नव्या उपहार गृहामुळे बंदयांमध्ये वाढतील रोजगाराच्या संधी : अमिताभ गुप्ता

Spread the love

येरवडा कारागृहात उपहारगृह इमारतीचे भुमीपूजन

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांनी सुरु केलेल्या उपहार गृहाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उपहार गृहाचे भूमिपूजन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

बंदयांमध्ये सकारात्मकता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दुसरे उपहारगृह सुरु करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे व. कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांच्या संकल्पनेतुन येरवडा खुले जिल्हा कारागृहबंदी संचलित श्रृंखला उपहारगृह हे 09 ऑगस्ट 2023 रोजी सुरु करण्यात आले आहे.

श्रृंखला उपहार गृहाच्या माध्यमातुन कारागृहातील बंदयांना पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह विभागाने एक चांगले पाऊल उचलले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हयातील कारागृहात श्रृंखला उपहार गृह बंदयांकडून यशस्वीरित्या चालविण्यात येत असून त्याचा फायदा नागरिकांना व बंदयाचे नातेवाईंकाना होत आहे.

येरवडा खुले जिल्हा कारागृह येथील पहिल्या श्रृंखला उपहारगृह यशस्वी वाटचालीनंतर व नागरिकांच्या चांगल्या प्रतिसादानंतर अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व. डॉ. जालींदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांच्या मार्गदर्शनाने श्रृंखला उपहारगृह -2 सुरु करण्यात येत आहे.

त्याचे भुमीपुजन, बंगला क्र.9, डॉन बॉस्को हायस्कुल गेट नं.3 समोर, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे-6 या ठिकाणी अमिताभ गुप्ता यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमास डॉ. श्री. जालींदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, सुनिल ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे. राजेंद्र मरळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, निशा श्रेयकर, तुरुंगाधिकारी श्रेणी-2 तसेच कारागृहाचे इतर अधिकारी व कर्मचारी वृंद हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमिताभ गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना, या श्रृंखला उपहारगृह संकल्पनेची माहिती देऊन बंदयांमध्ये सकारात्मकता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्व नागरिकांनी देखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांनी देखील श्रृंखला मध्ये सर्व प्रकारच्या खाण्याचे पदार्थ मिळत असून या उपक्रमामुळे कैदयांचे मनोबल वाढून त्यांचे चांगल्या प्रकारे पुर्नवसन होत असल्याचे सांगितले.