घरासमोरच लुटले, तिघांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील कृष्णा कॉम्प्लेक्स, संकेश्वर उद्यानाजवळ असणारे जाधव ज्वेलर्स दुकान बंद करून दुकानाचे मालक रवींद्र जाधव घराच्या दारासमोर दुचाकीवरून उतरत असताना तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून नऊ तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन जणां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना १३ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास बार्शीत मंगळवार पेठेतील मनगिरे मळ्यात त्यांच्या राहत्या घरासमोर घडली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र जाधव (वय ३९, रा. मनगिरे मळा) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना जाधव यांच्या घरासमोर सायंकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी घडली.
जाधव यांचा सराफी व्यवसाय असून त्यांचे जाधव ज्वेलर्स नावाचे कृष्णा कॉम्प्लेक्स, संकेश्वर उद्यानाजवळ दुकान आहे. दररोज सायंकाळी सव्वाआठ वाजता दुकान बंद करताना सर्व सोने-चांदीचे दागिने दोन पिशव्यांमध्ये घेऊन घरी जातात. गुरुवारी आठ वाजता दुकान बंद केले व मनगिरे मळा येथे घरी दुचाकीवर जात होते.
घरासमोर दुचाकी थांबवून उतरत असताना मागून तिघेजण दुचाकीवर आले आणि एकाने कोयत्याचा धाक दाखवला व जबर दुखापत करण्याची धमकी दिली. त्यावेळी हातातील दागिन्यांच्या दोन कापडी पिशव्या हिसकावून घेऊन निघून गेले.
दोन कापडी पिशवीतील ८ ग्रॅमचे नेकलेस, १५ ग्रॅमचे गंठण, १० ग्रॅमचे ३ नग, ५ ग्रॅमची बाळी, ४ ग्रॅमचे कानातले कुडके, १० ग्रॅमचे कानातील वेल, १० ग्रॅमचे झुबे, ४ ग्रॅमच्या कानातील रिंगा, ५ ग्रॅमची साखळी, २ ग्रॅमचा टेलिफोन, १० ग्रॅमच्या महिलांच्या अंगठ्या, ७ ग्रॅमच्या पुरुष अंगठ्या, असे ९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोख ७० हजार रुपये, पिशवीतील चांदीचे दागिने लंपास केले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
