महिला पोलीस उपनिरीक्षक यांना धक्काबुकी : जमिनीचा वाद असल्याचा संशय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिवसेना शिंदे गट) मनिष काळजे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर सदर बझार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मनिष काळजे जिल्हा प्रमुख (शिवसेना शिंदे गट) यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करण्यासाठी काही आरोपी आले असल्याची माहिती मिळताच भागातील शांतता भंग होऊ नये म्हणून बंदोबस्ता साठी गेलेल्या सोलापूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे यांनाच धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात सादीक उल्फत हुसेन शेख (वय-49 वर्षे), सोहेल सादिक शेख (वय-25 वर्षे), मोहसीन सादीक शेख (वय 23 वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या विषयी महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे यांनी माहिती दिली की, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला होणार असल्याची आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी गेलो असता, वरील आरोपींनी मला धक्का बुक्की केली. त्यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल केला आहे.
मनीष काळजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लोकसभेतील निवडणुकीच्या प्रचारामुळे व प्रणिती शिंदे यांची लीड कमी झाल्यामुळे हा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी हल्ला करण्यासाठी आले त्यावेळी मी संपर्क कार्यालयात होतो. त्यांची गाडी मला सी.सी.टीव्ही मध्ये दिसली.
त्यांनी माझे गेट तोडण्याचा प्रयत्न केला असता मी तातडीने पोलीसांना सूचना दिली. आरोपी विरोधात योगेश काळजे यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. राजकीय द्वेशा पोटी हा हल्ला झाला असल्याचे जरी सध्या समोर येत असले तरी हा वाद जमिनाचा असल्याचे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ला विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी संगितले की हा वाद जागेचाच असून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
