पुणे सायबर पोलिसांची चेन्नई मध्ये धडक कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नामांकीत ब्रोकर कंपन्यांकडील ग्राहकांचे डी मॅट अकाऊंट हॅक करून कोट्यावधींची फसवणुक करणाऱ्या आरोपीस पुण्याच्या सायबर पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. त्यामुळे पुणे परिसरातील आणखी सायबर गुन्हे उघडकीस येणार आहेत.
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये दाखल गुन्ह्यामध्ये चेन्नई (तामिळनाडू) येथून आरोपी व्यंकटेशन वर्धन यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पुण्यातील फिर्यादी यांचे डी मॅट अकाऊंटचा प्रायमरी मेल आयडी व प्रायमरी मोबाईल क्रमांक अनधिकृतपणे बदलुन, स्वतःचा मेल आयडी व मोबाईल क्रमांक लिंक करून फिर्यादीचे डी मॅट अकाऊंटवरील शेअर्स स्वतःचे डी मॅट अकाऊंटला ट्रान्सफर केले.
दाखल गुन्ह्यातील ७० लाख रूपयांचे शेअर्स आरोपीने फिर्यादीचे सी.डी.एस.एल. या डिपॉझीटरीला लिंक असलेले डी मॅट अकाउंट हॅक करून स्वतःचे बजाज सिक्युरिटीज डी मॅट अकाउंटला ट्रान्सफर करून घेतले. ते शेअर्स विकुन स्वतःच्या पंजाब नॅशनल बैंक खात्यावर रक्कम वर्ग करून घेतली व चेन्नईमधील वेगवेगळ्या एटीएमव्दारे व चेकव्दारे काढून घेतली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, हिमालय जोशी पोलीस उप निरीक्षक, सचिन इनामदार पोलीस अंमलदार, रवि राठोड, दिनेश मरकड, सचिन शिंदे यांनी केली.
आरोपी व्यंकटेशन वर्धन याने सिडको पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथील गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याबरोबर अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी व्यंकटेशन वर्धन याने अशाच प्रकारची फसवणूक आणखीन किती व्यक्तीसोबत केलेली आहे, आरोपीस डिमॅट अकाउंट आयडी व पासवर्ड सी.डी.एस.एल मधून कशाप्रकारे मिळाला याबाबतचा तपास सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर सायबर पोलीस करीत आहेत. तसेच कोणासोबत अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन यांच्या कडून नागरिकांना करण्यात आले आहे.
