संचेती ट्रस्टचा उपक्रम : खासदार सुप्रिया सुळेंकडे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रक्षाबंधनचे औचित्य साधत स्व. इंदुमती बनसीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्टकडून ‘वुई सपोर्ट विनेश फोगाट’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तिच्या मदतीसाठी संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांनी खासदार सुप्रिया सुळें यांच्याकडे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
ऑलिंपिक मध्ये जाण्यापूर्वीच अनेक विघ्नातूनही विनेश फोगाटला स्वतःला सिद्ध करावे लागले. फोगाट सारख्या रणरागिनीवर आणि देशाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच फोगटच्या सपोर्टसाठी आणि संपूर्ण नागरिकांना जागृत करण्यासाठी ‘वुई सपोर्ट विनेश फोगाट’ ही स्वाक्षरींची मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. यावेळी सुळे यांनी संचेती ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
ऑलिंपिक मध्ये जाण्यापूर्वीच अग्निपरीक्षेला सामोरे जाऊन खेळावर लक्ष केंद्रित करून ती शेवटच्या फेरीपर्यंत पोचली होती. भारताला सुवर्णपदक जवळपास निश्चित झाले होते. मात्र तांत्रिक प्रक्रियेत अडकून तिला थेट ऑलिंपिकमधून दुर्दैवाने बाहेर जावे लागले. त्यामुळेच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
धनादेश सुपूर्त करताना महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, मनिष संचेती, विजय शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारताची सुवर्णकन्या विनेश फोगाट हिला एका भावाकडून 1 लाख 11 हजार रुपयांचा निधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दिला आहे. एक नागरिक म्हणून आणि व्यापारी म्हणून मी छोटीशी जबाबदारी उचलण्याचा निर्धार मी केला आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि गुणवत्ता असूनही फोगाटला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पदक मिळाले नसले तरी संपूर्ण भारतवासीयांना तिचा अभिमान आहे. – अभय संचेती, अध्यक्ष, स्व. इंदुमती बनसीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट
