कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात माजी गृहमंत्र्यांच्या मुलाच्या ‘द व्हीलेज हॉटेल’मध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी धडक कारवाई केली.
या हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरविला जात असल्याचे समोर आले असून, कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाकिर रमेश बागवे (वय ३६, रा. भवानी पेठ), हरून नबी शेख (२५, रा. नोदीया, पश्चिम बंगाल), बिक्रम साधन शेख (२०, पश्चिम बंगाल), अमानत अन्वर मंडळ (२२, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेले बाकीर रमेश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्याचे पथक हद्दीतील बेकायदा व अवैध धंद्यांची माहिती घेत त्यावर कारवाई करीत होते. या मोहिमेदरम्यान गुरुवारी (दि.२९ ऑगस्ट) सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदीप बेड़िस्कर हे रात्रगस्तीवर होते.
त्यावेळी, खबऱ्यामार्फत पोलिसांना एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या ‘द व्हीलेज हॉटेल’ मध्ये चोरून ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
त्यावेळी ‘द व्हीलेज हॉटेल’चे चालक ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवित असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवर, ९ काचेचे हुक्क्याचे पॉट, व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तसेच, या सर्वांवर कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम गण २०१८ चे कलम ४ (अ), २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार, अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.
