आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीवनाला सार्थक बनवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 2, 2024
Spread the love

पुणे : आपल्याला जे प्राप्त आहे, त्याला सार्थक करणे हेच पर्युषण पर्व आहे. पर्युषण पर्व हे एक विलक्षण पर्व आहे, जे जीवनाशी संबंधित आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पू. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.

आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपण पर्युषण पर्वाकडे पाहायला हवे, अशी अपेक्षा प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी व्यक्त केली. प.पू. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, “पर्युषण पर्व हे जीवनाशी संबंधित असे पर्व आहे.

एका परिवारातसुद्धा विविध प्रकारचे लोक असतात, प्रत्येक व्यक्ती विभिन्न असते. त्याचप्रमाणे भगवान म्हणतात, बाह्यरंग ही जशी जीवनाची विविधता आहे, तसेच अंतरंग ही जीवनाची विविधता आहे. आपल्याला विविध रंग आवडतात, त्याचप्रमाणे अंतरंग हा सुंदर रंग आहे.

त्याने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. कषायमुळे रंगांची उत्पत्ती होते. आत्म्याच्या शुद्धतेला रंगण्याचे आणि त्याचे पावित्र्य कमी करण्याचे काम कषाय करतात. कोणतीही बाहेरची शक्ती तुम्हाला अंतरंगाच्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही, तिकडे तुम्हाला स्वतःलाच जावे लागते, असे भगवान महावीरांनी सांगितले आहे. अंतरंगाची शुद्धी जीवनात सर्वात महत्त्वाची आहे.”

“जीवनात आजूबाजूला काही चांगले घडत नाही, समाजात काही चांगले होत नाही, परिस्थिती वाईट आहे असे सांगून आपण एकूणच व्यर्थता कशी आहे हे सांगत राहतो. परंतु, आपल्याला जीवनात जी संधी मिळते, वेळ मिळतो, तो व्यर्थ न दवडता आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे. आपला भर हा निर्माणावर असला पाहिजे.

व्यर्थ समजून जो फेकून देतो, त्याच्याकडे जबाबदारी देता येत नाही. सार्थकतेची बुद्धी येण्यासाठी आपण प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. दुसऱ्याकडे आपण जर निंदेच्या दृष्टीने पाहू लागलो, तर आपल्या आयुष्यात कधीही समृद्धता निर्माण होणार नाही. कोणाचीही उपेक्षा करू नका. जीवनाच्या सार्थकतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपले अंतरंग उजळून निघणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या वर्षात आपल्या स्वभावातील कटुता, संकुचितपणा, दुष्टपणा या सगळ्या गोष्टींना त्यागून, आपल्या आयुष्याला सार्थक बनवण्याच्या दिशेने पाऊले टाकणे हे पर्युषण काळाचे खरे सार आहे,” असे मत प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी व्यक्त केले.