आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चांगल्या कामाची प्रेरणा महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 2, 2024
Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : ज्या शब्दांमधून आपल्याला जीवनाची दिशा मिळते, ते शब्द अत्यंत मोलाचे असतात. आपल्या जीवनाला आमूलाग्र बदलण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये असते. असे चांगले शब्दच आपल्याला चांगल्या कामाची प्रेरणा देत राहतात, असे विचार पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले.

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.

प.पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, चांगले काम पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. आपणही असेच स्वतःला चांगले बनवू शकतो. आपल्यालाही अशी चांगल्या कामाची प्रेरणा सतत मिळत राहायला हवी. तीर्थंकर महावीर यांनी प्राकृत भाषेत संवाद साधला होता, कारण ती त्या काळची जनभाषा होती. परंतु हळूहळू ती मागे पडत गेली.

ती क्लिष्ट वाटू लागली. परंतु महावीरांनी जे सांगितले आहे, ते आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण तीच परंपरा आपल्याला जपायची आहे. दररोज महावीरांच्या विचारांचे वाचन करून आपण त्यांची प्रेरणा आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

महापुरुषांनी उच्चारलेले शब्द हे त्यांच्या ध्यानातून, चिंतनातून आलेले असतात. ते अनमोल असतात. ते आपल्या कानावर पडणे आणि मनात उतरणे गरजेचे आहे. हजारो वर्षांपासून लोक ते ऐकत आले आहेत. शब्दांसह भाव जोडलेले असतात. शब्दांतूनच भाव एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. त्या अर्थाने भाषा ही भावनांची वाहक असते.

आपल्या जीवनात एखाद्या प्रकाशदीपाप्रमाणे शब्द काम करीत असतात. चांगल्या शब्दांतील भाव जेव्हा मनापर्यंत पोहोचतात, तेव्हा आपले हृदय स्वच्छ आणि चांगले होते. ज्या महापुरुषांनी आपल्या अनुभवाच्या कसोटीवर शब्दांना घासून त्यांना एक मौलिक अर्थ मिळवून दिलेला आहे.

तो आपल्या जीवनात जेव्हा उतरेल, तेव्हा परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होईल. मनुष्य नेहमीच प्रगाढ शांतीच्या शोधात असतो. त्याला ती आतूनच आणता येऊ शकते. शांती बाहेरून आणता येणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.